केदारनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वीच घडली मोठी दुर्घटना; हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एकाचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे.

दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी डोली उत्सव हिमालयातील मंदिराकडे रवाना करण्यात आला आहे. हिवाळ्यात बाबा केदारनाथ यांचे स्थान उकीमठ येथे नेले जाते. तेथून ही डोली आता केदारनाथ मंदिराकडे रवाना करण्यात आली असून ही डोली 24 तारखेला केदारनाथ येथे पोहचणार आहे. तर, बाबा केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलपासून उघडणार आहेत, त्यासाठी प्रशासन स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान, अश्यातच एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. बाबा केदारनाथची यात्रा सुरु होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. यातच उत्तराखंडच्या एका अधिकाऱ्याचा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत अधिकाऱ्याचे नाव ‘अमित सैनी’ असल्याचे सांगितले जात आहे. ते सिव्हिल एव्हिएशनमध्ये फायनान्शिअल कंट्रोलर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी सैनी हेलिकॉप्टरकडे जात होते. यावेळी घटनास्थळी उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओदेखील होते. सैनी हेलिकॉप्टरकडे जात असताना मागल्या टेल रोटर पंख्याला आदळले आणि त्यांची मान कापली गेली. यामुळे सैनी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बाबा केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलपासून उघडणार आहेत, त्यासाठी केदारनाथ मंदिराच्या सुशोभिकरणासाठी मंदिर समिती कार्यरत आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी हेली सेवाही धामवर पोहोचली आहे. केदारनाथ धामसाठी डीजीसीएने यावेळी नऊ हेली सेवांना परवानगी दिली आहे. तसेच, यात्रेकरू फक्त IRCTC वेबसाइट http://heliyatra.irctc.co.in वर तिकीट बुक करू शकणार आहेत.