चंद्राचा नवीन प्रवास सुरू..! पुन्हा खुलणार चंद्रमुखीच्या सौंदर्यची जादू; ‘चंद्रमुखी 2’ येतोय?

मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होत. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली होती. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत दिसला होता. तर, दुसरीकडे चंद्रमुखीची मुख्यभूमिका अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ हिने साकारली होती.

29 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृता खानविलकरच्या लावणीचं आणि तिच्या अदांचं प्रचंड कौतुक झालं. आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर यांची लव्हेबल केमिस्ट्री सर्वांना आवडली. त्यामुळेच आजही प्रेक्षक ‘चंद्रमुखी 2’ कधी येणार असा प्रश्न सतत विचारत असतात. दरम्यान, नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा ‘चंद्रमुखी 2’ची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत प्रसाद ओक, अमृता खानविलकर, मंजिरी ओक आणि चंद्रमुखी सिनेमात ज्याने लावणी कोरिओग्राफ केल्या असा नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील दिसतोय. या फोटोवर ‘अनपेक्षित भेट…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. मात्र, ही भेट जरी अनपेक्षित असली तरीही चंद्रमुखीची मुख्य टीम उपस्थित असल्याने ‘चंद्रमुखी 2’ भेटीला येणार का? याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. चंद्रमुखी जिथे संपला तिथेच चंद्रमुखी 2 चित्रपट सुरु होणार का? असा प्रश्न देखील सिनेरसिक विचारत आहेत.