अग्रलेख : कुचेष्टा नको; स्वागत व्हावे!

महाराष्ट्र सरकारने नवीन करोना व्हायरसच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठीची उपाययोजना सुरू केली आहे. त्यासाठी आजपासून राज्यातील सर्व महापालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जागरूकतेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुक व्हायला हवे असताना प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा विरोध आणि टिंगलटवाळी सुरू करण्यात आली आहे, ती दुर्दैवी आहे. 

“थंडी इटलीत आणि स्वेटर परभणीत’ अशा स्वरूपाच्या म्हणींचा वापर करून ठाकरे सरकारने केलेल्या या उपाययोजनांवर सुरू झालेली टीका अनाठायी आहे. मुळात हा नाताळाचा आणि वर्षाअखेरीचा काळ आहे. या काळात सर्वत्र रात्रीच्या पार्ट्यांचे, गेटटुगेदरचे, पर्यटनाचे तसेच मोैजमजेच्या सहलींचे आयोजन केले जाते. त्याला आवर घालण्यासाठीची ही उपाययोजना आहे आणि मुळात करोनाच्या धोक्‍याच्या मानसिकतेतून बाहेर आलेल्या जनतेत पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या धोक्‍याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी अशा स्वरूपाच्या उपाययोजना आवश्‍यक ठरतात. करोनाचा नवीन विषाणू रात्री अकरानंतरच ऍक्‍टिव्ह होतो का आणि तो सकाळी सहानंतर झोपी जातो काय, असे प्रश्‍न विचारून टिंगलटवाळी करण्याने मनोरंजन होईल पण धोका टाळता येणार नाही, ही बाब आपण ध्यानात घ्यायला हवी. 

या आधी करोनाचा धोका लक्षात येऊनही आपण योग्य ती काळजी न घेतल्याने भारतात तो वेगाने पसरला होता. यापासून आपण आता काही बोध घेणार आहोत की नाही हा यातला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू सप्टेंबर महिन्यात निर्माण झाला असून नोव्हेंबर महिन्यापासून त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली होती आणि डिसेंबरमध्ये तेथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. या मधल्या काळात ब्रिटनमधून अनेक जण भारतात आणि विशेषतः मुंबईत आले असण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे त्यांच्यामार्फत या नव्या विषाणूंचा शिरकाव झाला असण्याची किंबहुना होण्याची शक्‍यता छातीठोकपणे कोणाला नाकारता येईल काय? याचे उत्तर अर्थातच नाही असे असणार आहे. आता तर खुद्द ब्रिटनचेच पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून दिल्लीत येणार आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे सुरक्षा पथक आणि अन्य गोतावळाही येणारच. 

मागच्यावेळी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्यावेळी ट्रम्प यांच्याबरोबर म्हणे पाच हजार विदेशी नागरिक विनातपासणीच अहमदाबादला आले होते. आताही पुन्हा याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. मग जर अशी स्थिती आहे तर राज्य सरकारने प्रोऍक्‍टिव्हली अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. अशा निर्णयांची थट्टामस्करी करण्याची तर अजिबातच गरज नाही. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात या नव्या विषाणूचा धोका अधिक आहे. कारण मुंबईतून होणारी आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक देशातील अन्य कोणत्याही विमानतळापेक्षा अधिक आहे. त्यातही युरोप आणि ब्रिटनहून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. असे असताना राज्य सरकारने केंद्राच्या सूचनांवर अवलंबून राहून निर्धास्त झोपा काढणे, आपल्याला परवडणारे नाही. या नव्या विषाणूचा कहर दिसायला लागल्यानंतर सरकारच्या नावाने खडे फोडण्यात अर्थ नाही. त्यामुळे सरकारने खूप जागरूकपणे नवीन आव्हानाच्या संबंधात ज्या दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे त्याला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाहिजे. नव्या विषाणूंच्या संबंधात अन्य देशांनी ज्या उपाययोजना सुरू केल्या आहेत त्याही आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. 

सौदी अरेबियासारख्या देशांनी केवळ ब्रिटनहून येणारी विमानेच नव्हे तर संपूर्ण जगातून सौदीत येणाऱ्या विमानांना पुन्हा पंधरा दिवसांची बंदी घातली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात विदेशातून सौदीत आलेल्या सर्वच नागरिकांची नव्याने करोना चाचणी घेण्याचा आदेशही त्या सरकारने दिला आहे. त्या सरकारच्या या सावधगिरीच्या उपाययोजनांवर तेथे कोणी टीका केल्याचे ऐकिवात आले नाही. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकार वेळीच जागे झाले आहे याबद्दल आपण त्यांचे आभारच मानायला हवेत. आता भारत सरकारकडून नवीन आव्हानाबाबत काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणे महत्त्वाचे आहे. भारतानेही ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध घातला आहे. पण विदेशातून येणाऱ्या नागरिकांविषयी आपल्याला अधिक जागरूक राहावे लागणार आहे. 

करोनाच्या या नव्या विषाणूविषयी अजून पूर्ण वैद्यकीय संशोधन झालेले नाही. ते एव्हाना संबंधित देशांत सुरू झालेही असेल, पण भारतात त्या विषयीची काय स्थिती आहे हे अजून जाहीर झालेले नाही. तिकडे दिल्लीचे केजरीवाल सरकारही या विषयी “प्रोऍक्‍टिव्ह’पणे उपाययोजना करीत आहे. दिल्लीतही आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक मोठ्या प्रमाणावर असते आणि तेथेही विदेशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे केजरीवालांचे सरकारही या बाबतीत सतर्क झालेले दिसले आहे. पण त्यांच्यावरही तेथे काही जणांकडून टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. दुसऱ्याला वेड्यात काढण्यात आपले लोक अतिशय तत्पर असतात. पण अशा लोकांनी करोनाच्या संबंधातील आपला आधीचा अनुभव लक्षात ठेवायला हवा आहे. महाराष्ट्रातील रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज झाले आहेत. ती अत्यंत साहजिक प्रतिक्रिया आहे. कारण “ईयर एंड’चा हा त्यांचा सीझन खूप महत्त्वाचा असतो. आधीच्याच लॉकडाऊनचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला असल्याने त्यातून ते उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना हा दुसरा दणका झेलावा लागत आहेत. त्यामुळे त्यांच्यात संतापाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. याच भावनेतून ते शरद पवारांची भेट घेऊन ही रात्रीची संचारबंदी मागे घ्यावी अशी मागणी करणार असल्याचीही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

 कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या म्हटल्यातर त्यातून गैरसोय उद्‌भवणे साहजिक असते. पण याची गरज आणि धोका ओळखणेही तितकेच आवश्‍यक असते. यापुढील काळात साथीच्या रोगांचे नवनवीन विषाणू फैलावण्याची शक्‍यता वैज्ञानिकांनी या आधीच वर्तवली आहे. त्याचे स्वरूप आणि त्याचे परिणाम यासंबंधातील शास्त्रीय भाषेतील माहिती आणि संशोधन अहवाल नियमितपणे प्रसारित होत असतात. ते सर्वच सामान्य नागरिकांनी अभ्यासले पाहिजेत असे नाही पण जे धोके आपल्याला दृश्‍य स्वरूपात दिसू लागले आहेत त्या विषयी तरी आपण काळजी बाळगणार आहोत की नाही ही बाब महत्त्वाची आहे. करोनाच्या आधीच्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. येथे रुग्णांचे आणि मृतांचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यासाठी सरकारी यंत्रणेला जी विलक्षण धावपळ करावी लागली आहे त्याच्या साऱ्या आठवणी ताज्या आहेत. त्यातून शहाणे होऊन ठाकरे सरकार नव्या विषाणूच्या बाबतीत आधीपासूनच काळजी घेऊ पाहात असेल तर त्यांना साथ देणे, हा एकच पर्याय आपल्यापुढे आहे. 

Leave a Comment