पिंपरी | चैत्र पाडव्यानिमित्त निगडी परिसरात शोभायात्रा

पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती मंच यमुनानगर यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त येत्या ९ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे २४ वे वर्ष आहे. या वेळी सकाळी ७ वाजता गुढीची व ग्रंथदिंडीची पूजा करून शोभायात्रेची सुरुवात श्री अष्टविनायक मंदिर येथून होईल. शोभायात्रेची सांगता श्रीराम मंदिर, यमुनानगर येथे होईल.

या वर्षी २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यानिमित्ताने यावर्षी ‘मेरे घर राम आए है‘ या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे.

शोभा यात्रेमध्ये श्रीराम रथ, केरळी वाद्यवृंद, राजस्थानी समाज, माहेश्वरी समाज, गुजराती समाज, पंजाबी समाज, दाक्षिणात्य कांतारा वेशभूषेतील कलाकार, महाराष्ट्रातील विविध पारंपरिक वेशातील नागरिक, ढोल ताशा पथक, पौराणिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील शालेय मुले, महिलांचे लेझीम पथक, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांचा सहभाग असेल, अशी माहिती विकास देशपांडे यांनी दिली.