nagar | कर्जत-जामखेडमध्ये विक्रमी ६५.८१ टक्के मतदान

जामखेड, (प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकासाठी एकूण ६५.८१ टक्के मतदान पार पडल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली.

मतदान प्रक्रिया सर्व ठिकाणी शांततेत पार पडली. विविध केंद्रावर मतदारांनी रांगा लावत मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान जामखेडमध्ये तीन ठिकाणी तर कर्जतला ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन तांत्रिक कारणाने बदलावे लागले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ३५६ मतदान केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त मतदान करून घेण्यासाठी राजकीय मतदान प्रतिनिधी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती.

सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती. दुपारी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. काही मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांनी स्वीप समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

सर्व मतदान केंद्रावर प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार, जामखेड तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे तसेच ३८ क्षेत्रीय अधिकार्‍यांनी भेटी घेत आढावा घेतला.

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन मतदान केंद्रावर यासह फाळकेवाडी एक, तर कर्जत तालुक्यातील शिंदे, मिरजगाव आणि कर्जत येथील ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट तांत्रिक कारणाने बदलले होते.

कर्जत-जामखेडमध्ये पुरुष मतदार 1,77,336 तर महिला मतदार 1,59,567 आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण 3,36,903 मतदार आहेत. यामध्ये 1,22,742 पुरुष तर महिला मतदान 98,985 एवढे झाले आहे एकूण 2,21,727 एवढे मतदान झाले.