वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात, तर पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद

पुणे – भारती विद्यापीठ ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास सात दिवसांसाठी पोलीस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे. तर, विश्रामबाग ठाण्यातील पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कळसकर यांना अवैध धंदे व इतर कारणांवरुन सात दिवसांसाठी पोलीस नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे. कुंडलिक कायागुडे यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीच्या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला आहे. त्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे गुन्हा दाखल करुन कसुरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

उपायुक्तांनाही “समज’
पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता आणि सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी साप्ताहिक बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती केली होती. यामध्ये अवैध धंदे आणि बेशिस्तीवरुन अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धराले होते. महत्त्वाची घटना घडल्यानंतरही स्पॉटवर न जाणाऱ्या पोलीस उपायुक्तांनाही समज देण्यात आली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.