भारतात तेल घेऊन येणाऱ्या जहाजाला आग

कोलंबो  – कुवेतहून भारताकडे कच्चे तेल घेऊन येणाऱ्या एका जहाजाला लागलेली आग विझवण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. श्रीलंका नौदल व भारतीय जहाजांकडून हे काम सुरू आहे.

आग लागलेल्या जहाजावर एकूण 23 कर्मचारी होते त्यातील एका कर्मचाऱ्याचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ठार झालेला कर्मचारी फिलिपाईन्स देशाचा होता. जहाजाच्या इंजिन रूमपर्यंत ही आग पसरली. त्यात बॉईलरचा स्फोट होऊन हा प्रकार घडला.

कुवेतहून आलेल्या या जहाजात एकूण 2 लाख 70 हजार मेट्रिक टन कच्चे तेल आहे. ते भारताला पुरवले जाणार होते पण अंपाराजवळील समुद्रात या जहाजाला मोठी आग लागली. सुदैवाने या जहाजावरील तेल मात्र अद्याप आगीपासून सुरक्षित आहे.

ही आग या तेलसाठ्यापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न जारी आहेत. या प्रयत्नात भारतीय नौदलाचे आयएनएस सह्याद्री हे जहाजही सहभागी झाले आहे. भारतीय तटरक्षक दलाची आणखी दोन जहाजे या कामासाठी पाठवली जात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या डॉर्निअर विमानाचीही याकामी मदत घेतली जात आहे. हे जहाज सध्या पुर्व श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून समुद्रात 70 किमी अंतरावर आहे.

Leave a Comment