‘निवारा’ वृद्ध आश्रमात ‘स्वर-सांझ’ तर्फे केले खास गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – नवी पेठेतील ‘निवारा’ संस्थेतील विरंगुळा कक्षात सौ. जयंती पिल्ले संचलित “स्वर-सांझ” तर्फे ६ जून २०२४ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील स्थायिक निराधार, निराश व दुःखी आजी-आजोबांसाठी जुन्या हिंदी-मराठी कराओके गीतांचा कार्यक्रम संध्याकाळी ४ ते ६ या वेळात आयोजित केला होता.

कलाकारांनी सादर केलेल्या जुन्या जमानातील सुमधुर गीतांनी आजी-आजोबांना आनंद मिळाला. तर काही गाण्यांवर आजींनी तर दुःख एकाकीपणा विसरून ठेकाही धरला आणि मन प्रफुल्लित केलं. यावेळी सर्व कलाकारांनी त्यांची आपलेपणाने विचारपूस करून संवाद साधला. यामुळे त्यांनाही  कोणी जवळचं नातलग भेटल्याने मन भरून आले होते. यावेळी येथील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

जयंती पिल्ले संचलित “स्वर-सांझ” तर्फे करण्यात आलेल्या उपक्रमामुळे येथील आजी-आजोबांसोबत काही क्षणापुरता चैतन्य आणि आनंदाची उधळण करता आली. विशेष म्हणजे यात सहभागी झालेल्या हौशी कलाकारांनी एकत्र येऊन काॅनट्रिब्युशन करुन हा शो यशस्वी केला.

तसेच शोच्या संचालिका जयंती पिल्ले यांनी संस्थेमधील वृध्दांच्या एक वेळच्या जेवणाची खर्च दिला. या उपक्रमात जयंती पिल्ले, अर्चना जोशी, निशा बोथे, शिल्पा मराठे, छाया तुम्मल, स्नेह राम, शुभदा कोकीळ, उषा पार्टे, शिरीष माळवदे, आनंद गायकवाड, अशोक गायकवाड, अनिल भुकण, मोहन थत्ते या गायकांचा आणि साऊंड रियाज भाई आणि व्हिडिओग्राफर अमोल सोनवणे यांचा सहभाग देखील मोलाचा होता.