एका जिद्दीची कहाणी

भारताची अव्वल पॅरालिम्पिक बॅडमिंटनपटू मानसी जोशी जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली. मानसी जागतिक विजेती पॅराबॅडमिंटनपटू आहे. मात्र, अपघातात एक पाय गमावूनही तिने केवळ जिद्दीच्या जोरावर या खेळात अद्वितीय यश मिळवले. एखाद्या अपयशाने नकारात्मक मानसिकतेने खचून जात अनेक खेळाडू आपली कारकीर्द आणि आयुष्य दोन्ही गमावून बसतात. पण मानसीकडे पाहिले तर जिद्दीचे मूर्तीमंत उदाहरण काय ते सहज दिसून येते.

टाइम मासिकाने मानसीची निवड जगातील नवीन पिढीला प्रेरणा देणारी “नेक्स्ट जनरेशन लीडर’ म्हणून केली यातच सर्वकाही आले. मानसीसह एकूण 14 व्यक्तींचा बहुमान करण्यात आला आहे. त्यात केवळ मानसीच एकमेव भारतीय आहे. या 14 जणांमध्ये ती एकमेव पॅराऍथलिट आहे. इतकेच नव्हे तर टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली ती एकमेव पॅराऍथलिट आहे. केवळ इतकेच नाही तर बार्बी डॉल या जगप्रसिद्ध बाहुल्या बनवणाऱ्या अमेरिकेच्या कंपनीने मानसीला रोल मॉडेल म्हणून सन्मानित करताना मानसीच्या मुखवट्याची बार्बी डॉल तयार करत या बाहुलीचे बाजारात लॉंचिंग करत एक अभिनव भेटही दिली. अपघातात एक पाय गमावल्यानंतर मानसीने जसा प्रोस्थेटिक लेग म्हणजे कृत्रिम पाय बसवला आहे. अगदी तसाच पाय या बार्बी डॉललाही बसवण्यात आला आहे. एखाद्या खेळाडूचे जागतिक कौतुक केले जाते ते देखील एका भारतीय खेळाडूचे तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. एक अपंग खेळाडू किती यश मिळवेल, असे प्रश्न विचारून स्पर्धेपूर्वीच त्याचे खच्चीकरण करत असलेल्या आपल्या मानसिकतेला मानसीने जोरदार धक्का दिला आहे. मनात आणले तर एक महिला काय करू शकते हेच मानसीने सिद्ध केले आहे. तिच्या वागण्यात, बोलण्यात तसेच संवाद साधतानाही तिच्या शांत स्वभावाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. समाजाने पॅरा खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे सांगताना ती कोणावरही टीका करत नाही. तिला मिळालेल्या संधीचे तिने सोने केले. आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवत अनेक खेळाडूंनी जागतिक क्रीडा क्षेत्र गाजवावे अशी अपेक्षा आहे.

टाइम एशियाच्या मुखपृष्ठावर झळकलेला माझा फोटो पाहून पॅरा खेळाडू तसेच अपंगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा आशावाद जेव्हा ती व्यक्त करते तेव्हा तिच्यातील एक हळवी व्यक्तीही दिसून येते. माझ्या सारखी दिसणारी बार्बी डॉल जेव्हा तयार झाली व मी ती पाहिली तेव्हा यातून देशातील अनेक अपंग खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे मानसी सांगते. ही बाहुली जगप्रसिद्ध असल्याने लहान मुलांमध्येही अपंगांबद्दल सहिष्णूता निर्माण व्हावी हीच अपेक्षा आहे.

संगणक अभियंता असलेल्या मानसीला जवळपास आठ वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. चुकीच्या दिशेने आलेल्या एका ट्रकची तिला धडक बसली व या अपघातात तिला आपला डावा पाय गमवावा लागला. त्यानंतर ती जेव्हा कृत्रीम पाय बसवून घरी आली तेव्हाही ती खचलेली नव्हती. अपघात जेव्हा घडला तेव्हा दोन ते तीन तास रुग्णवाहिकाही मिळाली नव्हती. प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यासाठी 9 ते 10 तास उशीर झाला व त्यामुळेच तिला आपला पाय गमवावा लागला. तिचा स्वत:वर तसेच आपल्या मेहनतीवर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळेच ती यातून बाहेर आली. बॅडमिंटन या खेळात जागतिक यश मिळवायचे या जिद्दीने ती पेटून उठली व आज ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची विजेती आहे. पुढील वर्षी जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचेच, असा निर्धार केलेल्या मानसीला हे यश निश्चितच मिळेल, असा विश्वासही वाटतो.

गेल्या फेब्रुवारीपासून ती स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची वाट पाहत होती. करोनाच्या कठीण परिस्थितीतही मानसिकता सकारात्मक राखताना मानसीने आपल्या तंदुरुस्तीवर भर दिला. जेव्हा दक्षिण भारतातील करोनाचा धोका कमी झाला तेव्हापासून तिने सराव सुरू केला. फुलराणी सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांचे प्रशिक्षक व ऑल इंग्लंड विजेते खेळाडू पी. गोपीचंद यांच्याच अकादमीत मानसीही सराव करते. एक पाय गमावल्यानंतर प्रोस्थेटिक लेगच्या साहाय्याने मानसीने केवळ बॅडमिंटनचाच नव्हे तर ब्लेड-रनिंगचेही प्रशिक्षण घेतले. खरेतर असा पाय लावल्यानंतर सुरुवातीला धावणे तर दूरच उभे राहणेही अनेकांना जमत नाही. पण प्रचंड जिद्दीच्या जोरावर मानसी केवळ उभीच राहिली नाही तर बॅडमिंटनमध्ये जगज्जेतेपद मिळवले. तिने धावण्याचेही कौशल्य आत्मसात केले. तिच्या जिद्दीला सलाम करताना अनेक मानाचे पुरस्कारही तिला मिळाले. पॅराऍथलिटसाठी असलेला “टॉयसा’ तसेच “इंडियन स्पोर्टस लिजंड’सारखे मोठे पुरस्कारही तिने पटकावले. त्याचबरोबर बीबीसी इंडियन स्पोर्टस वुमन ऑफ दी इयर या पुरस्कारासाठीचे नामांकनही तिने मिळवले आहे. योगासने, धावणे, ध्यानधारणा तसेच सातत्याने नवे काही शिकण्याच्या तिच्या वृत्तीमुळेच तिला आज हे यश मिळत आहे.

मूळची मुंबईकर असलेली मानसी दक्षिणेत जरी सराव करत असली तरीही येत्या ऑलिम्पिकचे पदक तिला खुणावत आहे. खरे तर या खेळाकडेही ती केवळ अपघातामुळेच वळली. केवळ तंदुरुस्ती टिकवण्यासाठी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली व त्याची गोडी कधी लागली व त्यात तिने जागतिक यश कधी मिळवले याचे खुद्द मानसीलाही आश्चर्य वाटते. वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिपसह आशियाई स्पर्धेत दोन पदकेही तिने प्राप्त केली. दोन वर्षांपूर्वीपासून ती हैदराबादमध्ये गोपीचंद अकादमीत सराव करत आहे. मानसी आता केवळ भारताचीच नव्हे तर आशियाई पॅराबॅडमिंटनची रोल मॉडेल बनली आहे.

मानसीने निवडलेला बॅडमिंटन हा खेळ खरे तर अपंग खेळाडूंना खेळण्यासाठी खूपच कठीण असतो. कारण या खेळात अनेक वेळा हालचाली कराव्या लागतात. मात्र, मानसीने हे शिवधनुष्य लिलया पेलले व त्यात जागतिक वर्चस्व प्रस्थापित केले. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पॅरा गटातील सुवर्णपदक तिला खुणावत असून त्यात ती यशस्वी ठरली तर तो केवळ मानसीचा नव्हे तर तिच्या जिद्दीचा व तिला पाठबळ देणाऱ्या सर्वांचाच गौरव ठरेल.

अमित डोंगरे

Leave a Comment