उत्तरप्रदेशात एकूण चार अखिलेश यादव रिंगणात

लखनौ  – उत्तरप्रदेशाच्या निवडणुक रिंगणात सध्या अखिलेश यादव नावाचे एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यातील प्रमुख उमेदवार आहेत. तथापि या निवडणूकीत अन्य तीन अखिलेशांचे काय होणार हा औत्स्युक्‍याचा विषय आहे. समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, बिकापूरमधून कॉंग्रेसचे उमेदवार, गुन्नौरमधील अपक्ष आणि मुबारकपूरमधील सपा उमेदवार यांचे नाव अखिलेश यादव असे आहे.

मुबारकपुर मधील समाजवादी पक्षाचे उमेदवार अखिलेश यादव यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघात मला चांगला पाठिंबा मिळत आहे. लोकांची माझ्याबद्दल सहानुभूती आहे. मी 2017 च्या निवडणुकीत फार कमी फरकाने म्हणजे केवळ 688 मतांनी हरलो होतो. पण आता त्यांना अखिलेश यादव जिंकवायचे आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रमाणेच मी देखील मुबारकपूरचा आमदार व्हावे अशी येथील जनतेची इच्छा आहे असे ते म्हणाले.

मुबारकपूरमधून समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत अखिलेश यादव नावाच्या उमेदवाराच्या घोषणेने खळबळ उडाली होती, सपा प्रमुख दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याची अफवा त्यातून पसरली होती.तथापि मुबारकपुर येथील अखिलेश यादव हे वेगळे आहेत याचा खुलासा नंतर झाला.

आपले नाव अखिलेश कसे ठेवले गेले या विषयी बोलताना ते म्हणाले की, आमच्या वडिलांनी तीन भावांची नावे अवधेश यादव, उमेश यादव आणि अमरेश यादव अशी ठेवली होती. त्याच धर्तीचे आपले नाव असावे म्हणून त्यांनी माझे नाव अखिलेश असे ठेवले असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे करहाल मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या मतदार संघातील मतदान या आधीच झाले आहे.

तिन्ही अखिलेश नावाच्या उमेदवारांनी एक मात्र मान्य केले की समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांच्या नावाशी आमचे नामसाध्यर्म असल्याचा आम्हाला लाभच होत आहे. बिकापूर येथील कॉंग्रेसचे उमेदवार आणि कॉंग्रेसचे अयोध्या जिल्हाध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले की, 2016 मध्ये सपामधून बाहेर पडल्यानंतर मी कॉंग्रेसमध्ये सामील झालो. मलाही या नावाचा सध्या लाभ होतो आहे. तथापि मी पंजाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन जेव्हा करतो त्यावेळी मात्र लोकांचा थोडा गोंधळ उडतो असे त्यांनी नमूद केले.