काश्‍मीरी पंडितांसाठी ट्रॅन्झिट कॅम्प उभारणार

बारामुल्ला – काश्‍मीर पंडितांच्या 336 कुटुंबांसाठी काश्‍मीर खोऱ्यात एक ट्रॅन्झिट कॅम्प उभारण्यात येणार असून त्यासाठी 40 कोटी रूपये खर्च केले, जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज येथे बोलताना दिली.

या कॅम्पचा पायाभरणी समारंभ आज सोनोवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. काश्‍मीर पंडितासाठी केंद्र सरकारने घेतलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की काश्‍मीरातील लोकांनाही काश्‍मीरी पंडित पुन्हा काश्‍मीर खोऱ्यात परतावे असे वाटत आहे.

त्यांना आपल्या मूळ जागी शांततेत आणि सलोख्याने राहता यावे यासाठी हा ट्रॅन्झिट कॅम्प तेथे उभारण्यात येत आहे असे सोनोवाल यांनी म्हटले आहे. या प्रकल्पासाठी मोदी व शहा यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दलही सोनोवाल यांनी त्यांच्या विषयी गौरवोद्‌गार काढले.