मुंबईतील महिलेला तब्बल 25 कोटींचा गंडा; ऑनलाइन फसवणुकीने खळबळ

मुंबई – मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल 25 कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. आतापर्यंची सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पश्चिम उपनगरातील ज्या महिलेसोबत 25 कोटींची ऑनलाइन फसवणूक झाली आहे, ती महिला एका बहुराष्ट्रीय कंपनीतील निवृत्त संचालक असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी यांनीच मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव असल्याचे सांगितल्यानंतर या महिलेने घाबरून स्वतःचे आणि आपल्या आईचे शेअर्स विकले.

हा सर्व घटनाक्रम दोन महिन्यांपासून सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावानेच चालू बँक खाते उघडले होते. या खात्यात पैसे जमा करावेत, असे महिलेला सांगण्यात आले. त्यानुसार ही महिला पैसे त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा करत होती.

सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे ही महिला ज्या खात्यावर पैसे पाठवत होती, ते पैसे रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत, असे या महिलेला सांगितले गेले होते. पंरतु, अनेक दिवस उलटूनही महिलेने 25 कोटी पाठविल्यानंतर तिला तिचे पैसे परत मिळाले नाहीत.

त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आतापर्यंत 31 बँक खाती गोठविली आहेत. मुंबईतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक असल्याने पोलिसांकडून गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.