लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब

शरद पवारसाहेब हे बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशातील साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले मर्मज्ञ, रसिक व्यक्‍तिमत्त्व म्हणजे शरद पवारसाहेब!

राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे, तर केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रीय नेता म्हणून पवारसाहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला ठसा उमटवला आहे. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपणा, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर पवारसाहेबांनी “काटेवाडी ते दिल्ली’ हा मोठा पल्ला गाठलेला आहे.

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला शरद पवार हे नाव माहीत आहे. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्‍याचा भुगा करतात आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती, क्रीडा, कृषी, अर्थ क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारसाहेबांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं.

पवारसाहेबांची स्मरणशक्‍ती हा अफलातून गुण आहे. आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि असं घडलेलंही आहे. खेड्यापाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्‍ती आपल्याला पवारसाहेब ओळखतात एवढ्या आनंदातच ते कधी होते, ते कळतही नाही. अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारसाहेबांच्या डोक्‍यात असतात.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहात नाही. अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा असो वा राहुल बजाज किंवा मुकेश अंबानी असो वा सायरस पुनावाला अन्य कोणत्याही उद्योगपतींना शरद पवारसाहेब जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. नाट्य क्षेत्रातील जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन जोशी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.
पवारसाहेबांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवारसाहेब आहेत.

कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामती एम.आय.डी.सी, विद्या प्रतिष्ठान (शैक्षणिक संस्था), कृषिविकास प्रतिष्ठान, शारदाबाई पवार शिक्षण संस्था आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी बारामती परिसराचा सर्वांगीण विकास साधला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द हा त्यांचा आणखी एक वेगळा पैलू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यातील एक क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता आपण अनुभवला. पवारसाहेब ही एक व्यक्ती नसून विचारधारा आहे, एक मिशन आहे, तळागाळातील शेतकरी, वंचित, कष्टकरी समाजाची प्रेरणा आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची आशा आहे. साहेब, हे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे एक सुवर्णपान आहे. या वैश्‍विक लोकनेत्यास व महानायकास 80व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

प्रा.केतन भीमसेन डुंबरे
ग्रंथपाल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी
महाविद्यालय, मांजरी बु., पुणे 

Leave a Comment