केंद्राच्या शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधार ; निर्मला सीतारामन

भोरमध्ये लाभार्थींबरोबर साधला संवाद
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप सक्षमीकरण करणार
भोर –
स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस यांसारख्या अनेक योजनांमधून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, लाभ न मिळालेल्यांना लाभ देणार आहे. केंद्राने शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधारच दिला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचे सक्षमीकरण करणार असल्याचा दौऱ्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

वरवे (ता. भोर) येथील कार्यक्रमात सीतारामन यांनी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींबरोबर संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भोर, वेल्हा, मुळशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सीतारामन यांचा छत्रपती शिवरायांच्या स्मृती चिन्हांची भेट देऊन गौरवण्यात आले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपातर्फे मानपत्र सीतारामन यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

सीतारामन म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या चांगल्या योजना शासकीय अधिकारी आणि प्रसार माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. सरकारने 1 रुपया दिला, तर सर्वसामान्यांच्या हाती 15 पैसे येत होते, हा पैसा कोण खात होते, असा प्रश्‍न विचारून त्यांनी यावेळी करून विरोधकांनाही लक्ष्य केले. केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजना होतकरूंसाठी जामीन न घेता सुरू केली आहे, ती अदानी अंबानींना मोठे करण्यासाठी नसून सर्वसामान्यांसाठी आहे.

विरोधकांचे आरोप ‘मगरीच्या अश्रूं’सारखे

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघात हुशार लोक असून, त्यांना चांगली समज आहे. या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे सक्षमीकरण करण्यासाठी हा संवाद दौरा असल्याचे सांगून या मतदार संघातील विरोधक अर्थहीन गोष्टी करत असुन विरोधकांचे आरोप म्हणजे “मगरीचे अश्रू’सारखे असल्याची टीका यावेळी निर्मला सीतारामन यांनी केली.