‘आप’ मध्य प्रदेशात 230 जागा लढवणार; नियोजन सुरू

ग्वाल्हेर – मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजप-कॉंग्रेस प्रचाराच्या तयारीत व्यस्त असताना, आम आदमी पक्षही तयारीला लागला आहे. आम आदमी पार्टी राज्यातील सर्व 230 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. ग्वाल्हेरमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 14 मार्च रोजी येथे येत आहेत. ते एका जाहीर सभेतून निवडणुकीचा बिगुल वाजवतील.

आपचे राष्ट्रीय संघटन मंत्री संदीप पाठक म्हणाले की, आप राज्यातील सर्व 230 जागांवर निवडणूक लढवेल आणि आपला मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरादेखील घोषित करेल. मात्र, हा चेहरा कोण असेल हे वेळ आल्यावरच जाहीर होईल. सध्या आपचे गावपातळीपर्यंत संघटना बांधण्याचे काम सुरू असून येत्या 15 दिवसात संघटनेच्या विस्ताराचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आमचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागतील.

संघटना मंत्र्याने सांगितले की, 14 मार्च रोजी केजरीवाल आणि मान एक विशाल जाहीर सभा घेणार आहेत, ज्यामध्ये निवडणूक प्रचार सुरू होईल आणि आज ते त्याच सभेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. पाठक म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी देशात भाजपला रोखू शकते हे समजणे कोणत्याही व्यक्तीला अवघड नाही.

केजरीवाल यांना आता रोखले नाही तर नंतर त्यांना रोखणे कठीण होईल, हे या भाजप नेत्यांना माहीत आहे. पंजाब बघा की दिल्ली बघा. भाजप असे कृत्य करत आहेत, जे देशासाठी चांगले नाही. राजकीय शत्रुत्व आहे, राजकीय भांडण व्हायला हवे पण अशा प्रकारे निवडून आलेली सरकारे अस्थिर करणे, जनतेची कामे थांबवणे ही चांगली गोष्ट नाही.

पाठक म्हणाले की, आम आदमी पक्ष संघटना बांधणीत व्यस्त आहे. आम्ही योग्य लोकांना संस्थेत पदे देऊ. लवकरच राज्याच्या प्रत्येक गावात आमची संघटना उभी राहील. भाजप आणि कॉंग्रेसमधील असंतुष्टांना तिकीट देणार का, यावर पाठक म्हणाले की आमच्या पक्षाचा तिकिटाचा निकष स्पष्ट आहे. पक्ष जनतेला विचारतो. ही व्यक्‍ती मेहनती, प्रामाणिक आहे आणि काम करेल, असे जनता ज्याला सांगते, त्यालाच तिकीट द्या, पक्ष त्यालाच तिकीट देतो. आम आदमी पक्ष जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, तेव्हा भाजप आणि कॉंग्रेस त्याच्या विरोधात एकत्र निवडणूक लढवतात.