स्वच्छतेतून आरोग्याकडे

-विद्या शिगवण

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. आरोग्य आणि स्वच्छता यांचा फार जवळचा संबंध आहे. आणि स्वच्छता व समृद्धी यांचाही अतूट संबंध आहे. या दृष्टीने आपल्या सरकारची स्वच्छ भारत योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे स्वच्छतेशी निगडित असल्याने स्वच्छतेवर अधिक भर देणे हे अनिवार्य आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याला या गोष्टीची जाणीव पूर्णपणे झालेली नाही. वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता या परस्परांवर अवलंबून आहेत. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येकाने आपला खारीचा वाटा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने उचलला तर संपूर्ण देश स्वच्छ भारत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे, प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी अशा काही योजनांनी स्वच्छ भारतला गती आलेली आहे.

आज अगदी लहान गावांपासून ते मेट्रो सिटीजपर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. शासनाच्या माध्यमातून आज अनेक आरोग्य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर योजनांची व्यापक प्रसिद्धी व प्रचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आरोग्य सेवा पोहोचतील. लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असून त्यांवरील उपचार पद्धती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे. आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे स्वच्छतेतून समृद्धीकड ही संकल्पना मूर्तरूपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्‌भवणाऱ्या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यात येत आहे.

आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उद्यान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थाची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नद्या व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्या कचऱ्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे.

पण सर्वानी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खाद्यपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कचऱ्याची योग्य त्या ठिकाणी ओला सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्वच्छ भारत संकल्पना देशाला अधिक समृद्ध व सुंदर बनवणारी असून यासाठी आपला सर्वाचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.

Leave a Comment