अबाऊट टर्न : प्रदर्शनसंसर्ग…

कोविडचा जागतिक संसर्ग येऊन गेला, त्याला किती वर्षे झाली? असा प्रश्‍न आज विचारला, तर इंडियन प्रीमिअर लीग आणि इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये गुंतलेल्या कुणालाही पटकन उत्तर देता येणार नाही. या अत्यंत जीवघेणा आजाराच्या भयावह आठवणी आता जणू पुसल्या गेल्यात. जणूकाही कोविड येऊन शंभरेक वर्षे लोटली असावीत.

पण मेंदूचा रेकॉर्डर थोडासा रिवाइंड करून बघितला, तर अजूनही त्या दिवसांची भीषणता आठवेल. कोविड पन्नास वर्षांपूर्वी आला असता, तर कदाचित लोकांनी किमान दहा वर्षे तरी त्याच्या आठवणी काढल्या असत्या. कुणी म्हणेल, कटू आठवणी कशाला काढायच्या? वाईट पाठीवर टाकावं, चांगलं सोबत घ्यावं आणि पुढे जावं. हे बरोबरच आहे; पण ‘चांगलं’च्या यादीत वाईट दिवसांकडून घेतलेलं शहाणपण का असू नये? गडगंज पैसा असलेली माणसं त्या काळात एका इंजेक्शनसाठी कशी तळमळत होती, हे नजरेआड करण्यात काय हशील? सांगण्याचा हेतू एवढाच, की आर्थिक प्रगतीच्या कैफाचा जागतिक संसर्ग इतर कोणत्याही संसर्गापेक्षा मोठा आणि प्रदीर्घकाळ टिकणारा आहे. श्रीमंतीच्या हिडीस प्रदर्शनापुढे भलेभले कसे झुकतात, हे दाखवून देण्याचा सार्वत्रिक आजार कोविडपेक्षा भयानक नाहीये का?

हा आजार कोविडकाळातही दिसला. बहुतांश लोकांकडे पैसा नसताना बड्यांच्या घरांत शाही लग्नसोहळे झाले. आता तर आपण अमर आहोत, असं समजून काही ठिकाणी उधळपट्टी चाललीये. देशभरात ईडी वगैरे यंत्रणा अतिसक्रिय असण्याच्या काळात लहानशा राज्यातल्या लहानशा पक्षाचा एखादा नेता नोटांच्या ढिगार्‍यावर झोपून फोटो काढतो आणि तो वार्‍यासारखा व्हायरल होतो, याला काय म्हणायचं? बेंजामिन बासुमातारी नावाचे हे गृहस्थ आसामातले आहेत. नोटांच्या ढिगावर झोपून आजूबाजूला नोटा पसरून फोटो काढण्यामुळे नेमकं काय साध्य होत असेल? पैसा हीच आज सर्वांत मोठी शक्ती आहे आणि अक्षरशः काहीही विकत घेता येतं, हे दुर्दैवानं खरं आहे.

ज्या घरातून सरस्वतीच्या वीणेचा झंकार ऐकू येतो; पण लक्ष्मी नांदत नाही, ते घर दुर्लक्षित केलं जातं हेही वास्तव आहे. जवळ भरपूर पैसा आहे म्हटल्यावर तो कुठून आणला हे न विचारता संबंधित व्यक्तीला लोक मधमाशांप्रमाणे चिकटतात. पण त्यामुळे आपण अमर होत नाही. डळमळलेल्या पर्यावरणामुळे एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, तर श्रीमंती पाहून ती उंबर्‍यावर थांबत नाही. ती सगळ्यांनाच ओढून नेते.

पुढल्या सात पिढ्यांची कमाई करून ठेवण्याच्या कैफात आपण असाही विचार करत नाही, की सातव्या पिढीपर्यंत पृथ्वीवरचे नैसर्गिक स्रोतच संपले तर? या पृथ्वीवर राहण्यायोग्य वातावरणच उरलं नाही तर? या परिस्थितीला आमंत्रण देणार्‍या प्रक्रियेचा भाग होऊन तर आपण पैसे कमावत नाहीये ना? अरे हो..! अशा अतिआत्मविश्‍वासू धनिकांसाठी एक बातमी सांगायची राहिलीच! कोविडसारखा प्राण्यांमधून माणसात फैलावणारा आणखी एक आजार येतोय, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय. नोटांच्या बंडलवर सुस्तपणे झोपण्याऐवजी नोटांची घरं बांधता आल्यास पाहा!