अहमदनगर – प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या रागातून पोलिसास शिवीगाळ

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो, असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) रोजी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत घडला आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले (रा. किर्तीनगर, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. रेनवडी, ता. पारनेर) याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी सुधीर खाडे हे या पूर्वी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी तुषार येवले याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्याचा राग येवले याच्या मनात होता. त्यामुळे तो वारंवार त्यांना फोन करून शिवीगाळ करायचा. येवले याने शुक्रवारी (दि.३) सकाळी ९.३० च्या सुमारास खाडे हे तोफखाना पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्या मोबाईल वर फोन करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.