Bihar Politics: तेजस्वी यादव यांच्या रॅलीत चिराग पासवान यांना आईवरुन शिवीगाळ, बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले

पाटणा – राजकारणात शब्दांची मर्यादा हरवत चालली आहे. नेत्यांना काय बोलतो याचे भान राहीलेले नाही. त्याचाच एक नमुना बिहारमध्ये पहायला मिळाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिरग पासवान यांना जाहीरपणे आईचा उद्धार करणारी शिवीगाळ केली गेली. (Abusive Language Used Against Chirag Paswan’s Mother During Tejashwi Yadav’s Rally)

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण तापले आहे. त्यानंतर स्वत: तेजस्वी यांचे एक विधान समोर आले आहे. चिराग पासवान यांना कोण शिव्या देते आहे, अशी विचारणा करत आपण हे अजिबात सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर राजदच्या प्रदेशाध्यक्षांनीही शिव्या देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे जाहीर केले आहे.

चिराग पासवान यांना कोणी शिवी दिली? मी तर नाही दिली. मला तो व्हिडिओ पाठवण्यात आला होता व मी तो पाहिला. त्यात जनतेतूनच कोणीतरी शिव्या देत असल्याचा आवाज येतो आहे. व्यासपीठावरच्या कोणीही त्यांना शिवी दिली नाही. माझ्यासमोर कोणी बोलले असते तर ते सहन केले नसते असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की चिराग यांना शिवी देणे अत्यंत पीडादायी आहे आणि राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल. पक्षाकडून निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जमूईतील सदर व्हिडिओत तेजस्वी यादव यांचे भाषण सुरू असताना कोणीतरी चिराग पासवान यांना शिव्या देत असल्याचा आवाज ऐकू येतो आहे. पासवान कुटुंबाच्या संदर्भात अगदी घाणेरड्या शब्दांचा वापर केला जात होता. दरम्यान, या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना चिराग पासवान म्हणाले की तेजस्वी त्यांच्या लहान भावासारखे आहेत. त्या व्यासपीठावर ते उभे होते. त्यांच्याशी माझे जुने नाते आहे.

आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षातून आलो असलो याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांच्या कुटुंबाना शिविगाळ करावी. माझी आई आणि माझ्या बहिणीबद्दल जी टिप्पणी केली गेली त्यामुळे मी खूप दु:खी झालो आहे. तेजस्वी यांची आई आपल्या आईसारखी असल्याचे नमूद करत चिराग म्हणाले की कोणी जर माझ्यासमोर त्यांच्या विरोधात काही बोलले तर मी सडेतोड उत्तर दिले असते. राजकारण एकीकडे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत. लालूप्रसाद यादव मला पित्यासारखे आहेत, मी त्यांच्यासोबत काम केले आहे.