पुणे विद्यापीठात प्रशिक्षण, संशोधनासाठी ऍकॅडमी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे “एसपीपीयू-यूओएम ऍकॅडमी फॉर ट्रेनिंग ऍन्ड रिसर्च’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सहमती पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या ऍकॅडमीमुळे विद्यार्थी व शिक्षकांना एकमेकांच्या विद्यापीठात प्रशिक्षण-अध्यापन करता येणार आहे. याचबरोबर, संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून संशोधन व नाविन्यपूर्ण गोष्टींना पाठबळ मिळणार आहे.

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने स्थापन केलेली ही पहिलीच ऍकॅडमी आहे. याचा संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दर्जेदार संशोधन प्रबंध प्रसिद्ध करण्यासाठी तसेच, पेटंट मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. बी. एस. एम. राव यांच्या उपस्थितीत सहमतीपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मेलबर्न विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून प्रो. एन्ड्य्रू ड्रिनान, डॉ. अलेक्‍स जॉनसन आणि जेसिका पीईस हे उपस्थित होते.

मेलबर्न विद्यापीठासोबत पुणे विद्यापीठाने बीएस्सी (ब्लेंडेड), बीएस्सी (ब्लेंडेड)- पर्यावरणशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आता रसायनशास्त्र, भूशास्त्र या विषयांसाठी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम मेलबर्न विद्यापीठासह घेण्यात येणार असल्याने पदवी पातळीवर विज्ञान शिक्षण अधिक बळकट करण्यात मदत होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे पदव्युत्तर व पीएचडी पातळीवर शिक्षण घेणारे सक्षम व बुद्धिमान विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे.

सौमित्र भिडे “जाम’मध्ये प्रथम
शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील सौमित्र भिडे हा विद्यार्थी बीएस्सी (ब्लेंडेड)- बायोसायन्सेस या अभ्यासक्रमाच्या जॉईंट अडमिशन टेस्ट (जाम) या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेत पहिला आला आहे. ही परीक्षा एम.एस्सी.च्या प्रवेशासाठी घेतली जाते. तो बी.एस्सी. (ब्लेंडेड) हा अभ्यासक्रम शिकत असल्याने त्याला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांची चांगली समज येण्यास मदत झाली, असे त्याने सांगितले.

Leave a Comment