विनयभंगातील आरोपीला अवघ्या 36 तासात शिक्षा, 6 महिने “सक्त मजुरी’

पिंपरी – महिलेच्या विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 36 तासांत आरोपी हॉटेल व्यावसायिकाला सहा महिन्यांच्या शिक्षेसाठी कारावासात पाठवले आहे. हिंजवडी पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची सर्वत्र कौतुक केले जात आहे. समीर श्रीरंग जाधव (वय 31, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर जाधव याने महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले होते. महिलेने याबाबत 25 जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिला सहाय्यक निरीक्षक सपना देवताळे यांनी तत्काळ विनयभंगाच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी गुन्ह्याचा जलदगतीने तपास सुरु केला. घटनास्थळी धाव घेत सबळ पुरावा प्राप्त केला. दरम्यान, फरार झालेल्या आरोपीला 27 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास साखरे वस्ती येथे सापळा रचून अटक करण्यात आले. अशाप्रकारे रवींद्र मुदळ यांनी अवघ्या 36 तासांमध्ये आरोपीच्या विरोधात पुरावे जमा करून आरोपीसह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाने देखील चार तासात पीडित महिला, तिचे पती, मुलगा, प्रत्यक्षदर्शी, पंच आणि तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीला सहा महिने सक्त मजुरी आणि नऊ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. एवढ्या झटपट न्याय मिळाल्याने पीडित महिलेचे कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) देशमुख, सहायक निरीक्षक सपना देवताळे, तपासी अधिकारी उपनिरीक्षक रवींद्र मुदळ, कर्मचारी सचिन सानप, शंकर फलके यांनी ही कामगिरी केली.