satara | आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई

सातारा (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघासाठी 43 स्थायी निगरानी पथकांची (एसएसटी) पथकांची तर 35 भरारी निगरानी पथके (एफएसटी ) कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

यामध्ये पथकांमध्ये सीएपीएफ- एसएपी- एसआरपीएफ मधील जवानांची तात्काळ नेमणूक करण्यात आली असून या मनुष्यबळाने आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी व्यापक व परिणामकारक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.

मतदान प्रक्रीयेच्या शेवटच्या 72 तासांमध्ये आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे, निवडणूक प्रक्रीया शांततेत व पारदर्शी व भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी. यासाठी सदरचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.

सातारा लोकसभा मतदार संघामध्ये वाई – 7 एसएसटी 6 एफएसटी, कोरेगाव- 3 एसएसटी 3 एफएसटी, कराड उत्तर- 5 एसएसटी 5 एफएसटी, कराड दक्षिण- 5 एसएसटी 4 एफएसटी, पाटण- 4 एसएसटी 4 एफएसटी, सातारा- 7 एसएसटी 4 एफएसटी. माढा लोकसभा मतदार संघात फलटण- 5 एसएसटी 5 एफएसटी आणि माण- 7 एसएसटी 4 एफएसटी अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडील मनुष्यबळ पुरविण्यात आले आहेत. या एसएसटी व एफएसटी मधील मनुष्यबळाच्या मदतीसाठी सीएपीएफ- एसएपी- एसआरपीएफ कंपनीकडील एक हाफ सेक्शन 4 मे पासून 6 मे पर्यंत पुरविण्यात आलेले आहेत.

यामनुष्यबळाने एसएसटी व एफएसटी पथकांमधून आचारसंहितेच्या काटेकोर पालनाच्या दृष्टीकोनातून परिणामकारक व व्यापक स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.