भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भिडे गुरुजींवर कारवाई झालीच पाहिजे – रामदास आठवले

सोलापूर – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र सबळ पुरावे न मिळाल्यामुळे दोषारोप पत्रातून त्यांचे नाव काढून टाकण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला नुकतीच देण्यात आली आहे.

याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला असून संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव दोषारोप पत्रातून काढून टाकल्यानंतर रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.

सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातून वगळण्यात आले असले तरी त्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे शोधावेत. भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण आग्रही असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आपली ठाम मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ठोस पुरावे मिळाले नसले तरी भिडे गुरुजी यांचे नाव वगळल्यामुळे संशय असून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण ठाम आहोत. त्यासाठी भिडे गुरुजी यांची आणखी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.