कुकडीचे पाणी उपसणाऱ्या 21 मोटारींवर कारवाई; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदा: कुकडीचे सुरू असलेले आवर्तन हे फक्त पिण्यासाठी आहे. शेतीसाठी उपसा करणाऱ्या तब्बल 21 मोटारींवर भरारी पथकाने कारवाई केली असून दोन अज्ञात व्यक्‍तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना माळी म्हणाले, कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रात आवर्तन सुरू असून हे पाणी आवर्तन हे फक्त पिण्यासाठी असून पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये महसूल विभाग, पोलिस विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण या सर्व विभागांचे कर्मचारी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध उपसा आढळुन आल्यास संबंधित यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार आज अखेरपर्यंत 21 मोटारींवर कारवाई करण्यात आली आहे तसेच 2 अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यामुळे कोणीही कॅनाल परिसरात अवैध पाणी उपसा करणार नाही याची दक्षता घेणे बाबत निर्देश आहेत. तसेच गुन्हे दाखल करणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदरची कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे माळी यांनी सांगितले. ही कारवाई तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपअभियंता कुकडी विभाग सोलंकी यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Comment