अभिनेत्री हंसिका मोटवानीला करावा लागला भेदभावाचा सामना, म्हणाली ‘काही डिझायनर कपडे…’

मुंबई – अभिनेत्री हंसिका मोटवानीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खास करून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केले आहे. मात्र यावरून अनेकदा भेदभाव केला जात असे. इंडस्ट्रीच्या नावाखाली तिच्याशी काही डिझायनर्सने भेदभाव केल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

हंसिकाने सांगितले की, ‘काही डिझायनर मी दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याने मला कपडे देण्यास स्पष्टपणे नकार देत असत. पण आता गेल्या काही वर्षात खूप बदल झालेला आहे. माझ्याकडे दुर्लक्ष करणारे डिझायनर आज मला त्यांचे कपडे चित्रपटाच्या ट्रेलर आणि इतर कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी पाठवतात. अशी वागणूक देणाऱ्यांबाबत माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही.’

पुढे ती म्हणाली की, ‘असे अनेक डिझायनर होते, जे दाक्षिणात्य कलाकारांना कपडे देण्यास नकार द्यायचे. आम्हाला आमचे कपडे द्यायचे नाहीत, असे ते म्हणायचे. पण आज ते लोक स्वतःहून येतात आणि चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात आमचे कपडे घाला, असे म्हणतात. मी पण प्रेमाने होकार देते. कारण माझ्यात आणि त्यांच्यात फरक असला पाहिजे. मला तेव्हा वाटलं होतं की मी एवढी मेहनत केली तर हे लोक माझ्याकडे परत येतील.’