करोना संसर्ग आटोक्‍यात आल्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू ः शिक्षणमंत्री

पुणे – करोना परिस्थितीचा पंधरा दिवसांत आढावा घेऊन संसर्ग आटोक्‍यात आल्यासच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

यंदाही ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. टास्क फोर्स करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता याला शासनाकडून सतत प्राधान्य देण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळण्यास आधी दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर इतर वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

मागच्या वर्षी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. यंदा मात्र करोना संसर्गाची परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. परिस्थिती लवकर न सुधारल्यास मात्र अभ्यास क्रम कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळा कधी सुरू होतात यावर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून यंदाही सह्याद्री वाहिनी, दीक्षा ऍप, गुगल, व्हॉटसऍपसह इतर साधनाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.