‘अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका’ Z प्लस सुरक्षा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई – देशात करोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे तातडीने करोना लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. मात्र लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यातच लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगत सुरक्षेसाठी लंडन गाठले आहे. यावरून राजकारण तापलं आहे.

यातचआता कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून यावेळी त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.मुंबई हायकोर्टात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे की,’जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखं आहे.’असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते की, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समूहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. त्यांच्या बोलण्याला धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे, असंही ते म्हणाले होते.

(Adar Poonawalla , Adar Poonawalla Z Plus Security , Mumbai High Court)