आदेशिका : स्वागत पुस्तकांचे

न्या. दिलीप देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व अभ्यासातून आदेशिका (दिवाणी) हा ग्रंथ मार्च 2021 मध्ये प्रसिद्ध केलाय. विशेष म्हणजे मायमराठीचा न्यायालय व प्रशासन व्यवस्थेत व व्यवहारात वापर करण्यासाठी समर्पित भूमिपुत्रांना हा ग्रंथ अर्पण केलाय. न्यायदानाची ही मराठी भाषेवरील निष्ठा सर्वांसाठी वंदनीय ठरावी. 

न्या. देशमुखांचे गुरू र. च. चव्हाण यांची छोटीशी पण दर्जेदार व अर्थपूर्ण प्रस्तावना या ग्रंथास लाभली आहे. यापूर्वीच देशमुख यांच्या आदेशिका (फौजदारी) ग्रंथाचे प्रकाशन झालेय. त्यामुळे आता न्यायिक व्यवस्थेचे नेतृत्व करू पाहणाऱ्या नव्या न्यायाधीश मंडळीसाठी या आदेशिका निश्‍चितच मार्गदर्शक ठरणार आहेत.

वकिलीचा अनुभव न घेता थेट न्यायाधीश म्हणून सेवेत प्रवेश करणाऱ्या नव्या लोकांसाठी या ग्रंथाचा निश्‍चितच उपयोग होणार आहे. कारण कलम, आदेश, नियम यांची संहिता अनुभवाच्या शहाणपणातून नमुना आदेशिकेत प्रतिबिंबित झाल्याच्या साक्षी गौरवास्पद आहेत.

तीन भागांत या आदेशिकांची सुटसुटीतपणे विभागणी केली आहे. प्रत्येक आदेशिकेत प्रस्तावना, न्यायनिर्णय, कारणे आणि आदेश यांची आकृतिबंधात नोंद केल्यामुळे कलम व नियमांची तांत्रिक बाजू निर्दोषरित्या स्वयंसिद्ध झालीय. 

न्यायालयीन प्रक्रियेतील टप्पे क्रमाक्रमाने नोंदवल्यामुळे वकील व न्यायाधीशांसोबतच कायद्याच्या सर्वच अभ्यासकांची सोय झालीय. दिवाणी दावा दाखल करण्यापासून अंतिम निकाल लागेपर्यंतची किचकट प्रक्रिया देशमुखांनी सुलभ पद्धतीने शब्दबद्ध केलीय.

या ग्रंथात मराठी प्रमाण भाषेचाच वापर केला असून इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळलेत. अर्थात न्यायव्यवस्थेत मराठीचाच वापर करावा, ही लेखकाची भूमिका इथे प्रत्यक्षात अनुभवता येते. वादी, प्रतिवादी, हुकूमनामा, दावा, समन्स, साक्षीदार अशा शुद्ध मराठी शब्दांनी मातृभाषेचा गोडवा रुक्ष वाटणाऱ्या कायद्याच्या पुस्तकात पेरून ठेवलाय. प्रतिवादीस दाव्यांचे समन्स पाठवणे, मुद्रांक जमा करणे, प्रतिवादी हजर नसल्यास एक तर्फी दावा चालवणे, वादी व प्रतिवादीचे दावा/बचावाचे निवेदन.

साक्षीदारासंबंधीचं वेगवेगळ्या परिस्थितीतील आदेश, अशा न्यायप्रक्रियेतील महत्त्वाच्या पायऱ्या व तांत्रिक संदर्भाने व्यावहारिक व कायदेशीर मार्गदर्शन या लिखाणातून जरूर होते. 264 पानांचा हा दिवाणी आदेशिकांचा ग्रंथ कायद्याची माहिती व त्यांचा प्रत्यक्ष न्यायप्रक्रियेतील वापर या संबधाने उपयुक्‍त ठरणारा आहे.

न्यायप्रक्रियेतील वादी व प्रतिवादीच्या हक्‍काची व त्यांच्या डावपेचांची प्रारंभीच्या काळत माहिती नसते तेव्हा या मंडळीचा आत्मविश्‍वास जागवण्यासाठी व न्यायदान प्रक्रिया सुलभपणे आकलन होण्यास न्या. देशमुख यांचा ग्रंथ निश्‍चित उपयुक्‍त ठरणारा आहे.

देशमुख निखळपणे फक्‍त विविध कलमांसह संबंधित विषयासंबंधीचा आकृतिबंध देतात. त्यातील विशिष्ट पर्यायावरील प्रक्रियेची तांत्रिकता सांगतात. प्रशासकीय व कायदेमंडळाच्या विसंवादात न्यायपालिकाच आपल्या अंगभूत सामर्थ्याने लोकशाही सुसंगत भूमिका बजावतेय. या पार्श्‍वभूमीवर या ग्रंथाचे मूल्य स्वयंसिद्ध ठरावे.