आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात; इस्रो प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

Aditya L1 : भारताने चंद्रयान-3 ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत इतिहास घडवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. त्यानंतर सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात भारताचं आदित्य L1 यानं पाठवले. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता भारताचं आदित्य L1 यानं हे आता आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अंतराळातील पृथ्वी आणि सुर्या दरम्यान एल-1 पॉइंटवर आदित्य प्रवेश करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 रोजी सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुर येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. ते म्हणाले की, आदित्यचा निर्धारित प्रवास सुरळित सुरू आहे. ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे. एल-1 बिंदूजवळ पोहचण्याची प्रक्रीया शक्यतो 7 जानेवारी 2024 रोजी पूर्ण होईल.

‘आदित्य-एल1’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम आहे. इस्रोचे आदित्य एल-1 2 सप्टेंबर रोजी सूर्याकडे झेपावले. आदित्य एल-1 हे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान एल 1 बिंदूपर्यंत जाणार आहे. एल-१ बिंदू सूर्याच्या सर्वांत जवळचा मानला जातोप्रक्षेपणानंतर ते पोहोचण्यासाठी 125 दिवस लागतील. त्यानंतरच आदित्य एल1 सूर्यावर संशोधन सुरू करू शकेल.

मिशनची उद्दिष्टे काय आहेत?

भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य एल-1 (Aditya-L1) सौर कोरोनाची रचना (सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरील भाग- प्रभामंडल) आणि त्याची उष्णता प्रक्रिया, त्याचे तापमान, सौर उद्रेक आणि सौर वादळांची कारणे आणि उत्पत्ती, कोरोना आणि कोरोनल लूप प्लाझ्माची रचना, वेग आणि घनता, कोरोनाच्या चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप, कोरोनल मास इजेक्‍शनची उत्पत्ती, उत्क्रांती आणि हालचाल (थेट पृथ्वीच्या दिशेने प्रवास करणारे सूर्यावरील सर्वात शक्तिशाली स्फोट), सौर वारे आणि अंतराळ हवामानावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.