nagar | मतदानासाठी प्रशासन सज्ज

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या सोमवारी (दि.१३) होणाऱ्या मतदानासाठी श्रीगोंद्यात प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारसंघात ३४५ मतदान केंद्र असून, २ हजार ५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुक्यातील ११६ आणि नगर तालुक्यातील ४४ गावे असा एकूण १६० गावांचा समावेश आहेत. मतदारसंघात एकूण ३ लाख २८ हजार ९६६ मतदार आहेत. यापैकी १ लाख ७२ हजार ४३ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ५६ हजार ९२० महिला मतदार आहेत.

तीन तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्रीगोंदा व नगर तालुक्यात अनुक्रमे २६० व ८४ अशी एकूण ३४४ मतदान केंद्र आहेत. वांगदरी येथील एका केंद्रावर मतदार संख्या दीड हजारांहून अधिक असल्याने तिथे एक सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे.

३४५ पैकी १७३ मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ व्यवस्था बसविण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे काम पाहणार आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई अशी प्रत्येकी पाच जणांची टीम असणार आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह होमगार्ड मतदान केंद्रावर बंदोबस्त पुरविणार आहेत. मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण २ हजार ५५० अधिकारी, कर्मचारी, पोलीस सहभागी असणार आहेत.

यामध्ये मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २ पोलीस उपअधीक्षक, ६ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक व उपनिरीक्षक यांच्यासह ४५० पोलीस कर्मचारी आणि २०० होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. अधिकारी-कर्मचारी तसेच मतदान यंत्रे वाहतुकीसाठी ६९ मार्गांसाठी एकूण ६९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान यंत्रात बिघाड अथवा मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास दोन शीघ्र प्रतिसाद पथक गठीत करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे राखीव मतदान यंत्रे असणार आहेत.

काष्टी, पेडगावमध्ये ‘एसआरपीएफ’ तैनात!
तालुक्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. मात्र, मागील काही निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता तालुक्यातील काष्टी आणि पेडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात असणार आहेत. तर दोन तुकड्या राखीव आहेत.