नगर | बालकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर

नगर (प्रतिनिधी) – आजची बालके हे उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत. या बालकांच्या विकासातुनच आपला देश अधिक बलशाली होणार असल्याने जिल्ह्यातील बालकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची, ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

स्नेहालय संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. बी. वारुडकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकुर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, परीविक्षा अधिकारी संध्या राशिनकर, स्नेहलयाचे गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव अनेक बालकांनी सहभाग नोंदवला आहे. बालकांना मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असुन १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन आनंद व्दिगुणित करावा. कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे तांत्रिक अडचणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. मैदानी खेळ खेळताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर राहणाच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

यावेळी वारुडकर म्हणाल्या, दि. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरणही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.