कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी प्रशासकांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) -: कोवीड कालावधीत काम करताना महापालिकेच्या मयत झालेल्या 13 कर्मचाऱ्यांच्या घरी दिपावली निमित्त महापालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अधिकाऱ्यांनी भेट दिली.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र नागरीकांच्या सेवेत कोरोनायोध्दा म्हणून काम केले. एकीकडे संपुर्ण शहर लॉकडाऊनमध्ये घरामध्येच असताना महापालिकेचे कोरोना योध्दा नागरीकांच्या सेवेमध्ये होते. कोरोना कालावधीत काम करताना काही कर्मचाऱ्यांना कामावर असतानाच कोरोनाची लागण झाली. यामध्ये 13 कोरोनायोध्दांचा मृत्यू झाला.

राज्य शासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून तातडीने प्रयत्न करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रशासकांनी व अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरी भेटी देऊन फराळाचे साहित्य दिले. यामध्ये वर्कशॉप विभागाकडील कोरोनायोध्दा कै.रमेश पोवार यांच्या रामानंदनगर येथील घरी प्रशासकांनी भेट देऊन फराळाचे साहित्य दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.

याचबरोबर इतरही मयत कोरोनायोध्दांच्या घरी खातेप्रमुखांनी भेट देऊन फराळाचे साहित्य दिले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.रमेश पोवार, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, वर्कशॉप अधिक्षक चेतन शिंदे, वैदयकिय अधिकारी डॉ.मंजूश्री रोहिदास, डॉ.विद्या काळे उपस्थित होते.