कौतुकास्पद! दोन जिवलग मित्र एकाच वेळी बनले महाराष्ट्र पोलीस

डोर्लेवाडी : जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. खडतर परिस्थिती असताना देखील गेली अनेक वर्ष पोलीस भरतीची प्रॅक्टिस करून बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावातील दोन जिवलग मित्रांनी एकाच वेळी महाराष्ट्र पोलीस बनण्याचा बहुमान मिळवला आहे. कुलदीप सूर्यवंशी आणि कलीम सय्यद अशी महाराष्ट्र पोलीसात भरती झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत.

कुलदीप सूर्यवंशी आणि कलीम सय्यद हे दोघे देखील सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कुलदीप याचे वडील बाळासाहेब दगडु सुर्यवंशी हे गेल्या वीस वर्षांपासून ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तर कलीम सय्यद याचे वडील नजीर सय्यद दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

गरिबीची जाण असलेल्या कुलदीप आणि कलीम या दोघांनी कुठलाही खाजगी क्लास न लावता आपल्याच झारगडवाडी गावामध्ये केवळ जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीसात भरती होण्याचा मान मिळवला आहे. कुलदीपने सुरुवातीला होमगार्डमध्ये तीन वर्ष काम केले आहे. तर कलीमने इलेक्ट्रिशनचे मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाला हातभार लावला आहे. या दोघांनी मिळवलेल्या यशाचे झारगडवाडी व पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

“कुलदीप आणि कलीम हे दोघेही मेहनती आणि कष्टाळू आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्या दोघांनी महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या जिद्दीला खरोखरच सलामच आहे त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो. त्यांनी आता चांगल्या प्रकारे देश सेवा करून आपल्या आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्वल करावं. गरीब परिस्थितीवर मात करून दोघांनी यश संपादन केले आहे. इतर मुलांनी त्यांची प्रेरणा घेत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करावे, असे अजित बोरकर (ग्रामपंचायत सदस्य, झारगडवाडी)  म्हणाले.