‘नागरीकत्वासाठी जगभरात अवलंबली जाणारी पद्धत अवलंबा’ – ममतांची केंद्राला सूचना

सिलिगुडी (पश्चिम बंगाल) – नागरीकत्वाच्या बाबत जगभर जी प्रथा किंवा नियमावली अवलंबली जाते, ती मोदी सरकार भारतात का अवलंबत नाही, त्यांना सीएए कायदा कशासाठी हवा आहे असा सवाल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पहिल्यापासूनच सीएए कायद्याला सक्त विरोध दर्शवला आहे.

सीएए एनआरसीशी संबंधित आहे. यूएसएमध्ये तेथे कोणी पाच वर्षे राहुन शिक्षण घेतले तर त्याला ग्रीन कार्ड मिळते. जगभरात सर्वत्र देश समान नियम पाळतात. पण त्यांनी बंगालमध्ये, भारतात काय केले? त्यांनी बांगलादेश किंवा इतर विविध ठिकाणांहून आलेल्या संपूर्ण मुस्लिम समुदायाला संपवले आहे, असे बॅनर्जी यांनी सिलीगुडी येथील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना सांगितले.

नियमांमध्ये स्पष्टता नसल्याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या जर एखाद्याला नागरीकत्वाचे अधिकार मिळाले तर आम्ही आनंदी आहोत. पण यासाठी तुम्ही जगभरात प्रचलित असलेल्या प्रणालीचे अनुसरण करू शकता. या देशात सलग पाच दहा वर्ष राहणारे किंवा या देशात विवाह करणाऱ्याला नागरीकत्व दिले जाऊ शकते, पण सीएए कायद्यातील नियम मात्र विघातक आहेत.

ममता म्हणाल्या भाजप हिंदू हिंदू अशी बडबड करत आहे. त्यांची हिंदूची वेगळी छटा आहे. हा दुर्गापूजा साजरी करणारा हिंदू धर्म नाही. त्यांनी हिंदू धर्माची एक नवीन जात निर्माण केली आहे जी हिंदू धर्माला कलंकित करते आणि त्यांचा अनादर करते,असे त्या म्हणाल्या.

बंगालमधील काही नागरिकांची आधार कार्डे कथितरित्या निष्क्रिय करण्याच्या केंद्र सरकारच्या अलीकडच्या कृतीची लोकांना आठवण करून देताना ते आता तुमचा मतदानाचा हक्कही हिरावून घेतील असा इशारा त्यांनी दिला.