पिंपरी | घरकुल योजना राबविण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही

कर्जत, (वार्ताहर) – कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगावातील आदिवासी वाडीत राहणाऱ्यांना घरकुल योजना द्या, म्हणत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. याबाबत उपविभागीय कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयात अमोघ कुळकर्णी सह सर्व महिलांनी निवेदन दिले होते. तीन दिवसांनी संबंधित अधिकारी वर्गाने आदिवासी वाडीत भेट देऊन त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे तात्पुरता बहिष्कार उठण्यात आला आहे.

भिसेगावातील आदिवासी वाडीत तहसीलदार शीतल रसाळ , मुख्याधिकारी वैभव गारवे आणि आंदोलनकर्ते अमोघ कुळकर्णी उपस्थित होते. या वेळी अधिकारी वर्गाने महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी भिसेगावाच्या वाडीमध्ये गुंडगे गावातील आदिवासी वाडीतील महिलांनी गर्दी केली होती.

निवडणूक होणापर्वी समस्या सोडवू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, लेखी अश्‍वासन द्या, असे कुळकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या अश्वासनानंतर मतदानावरील बहिष्कार तात्पुरता मागे घेण्यात आल्याचे सांगितले आहे. लवकरच तहसीलदार शीतल रसाळ आणि मुख्याधिकारी वैभव गारवे हे घरकुल योजना राबवून आदिवासींना हक्काचे घर मिळवून देतील. तसेच वाढीव घरपट्टी कमी करण्यात येईल. बाकी रस्ता, गटारे आणि पाण्याची समस्या त्या त्वरित सोडवू, असे सांगण्यात आले आहे.