पुणे जिल्हा | अयोध्येपाठोपाठ आता मथुरेत श्रीकृष्ण मंदिर

आळंदी, (वार्ताहर) – अयोध्या, काशी, मथुरा ही पवित्र ठिकाणे आहेत. ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर देखील निर्माण होईल. तसेच मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आहे.खेड तालुक्यातील आळंदीमध्ये गीत- भक्ती अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुण्याचे पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची परेड काढली होती.

आता ज्येेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणार्‍याची परेड काढणार का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील, त्यांच्या बद्दल मला विचारायचे. संजय राऊत यांच्याबद्दल काय विचारता, असे म्हणत या विषयावर भाष्य टाळले.

तसेच माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगरमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का असे विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इच्छा असणे गैर नाही. शेवटी पक्ष निर्णय घेतो. पक्ष जो निर्णय घेईल तो राम शिंदे किंवा अन्य कोणी मान्य करतील, असे फडणवीस यांनी नमूद केले.

जिल्ह्यात दुसर्‍या विमानतळाची तयारी सुरू
पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ करण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ लवकरच अयोध्येला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 फेब्रुवारीच्या महाराष्ट्र दौर्‍याची सविस्तर माहिती आली नाही, त्यामुळे त्याबाबत बोलता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.