किती बळींनंतर लोकप्रतिनिधींना जाग येणार?

उमेश सुतार
नाणेगावच्या संतप्त ग्रामस्थांचा सवाल

कराड  – चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. याला केवळ लोकप्रतिनिधी व प्रशासनच जबाबदार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. नेमके किती बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग येईल? असाही प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

पाटण तालुक्‍यातील चाफळ हा विभाग दुर्गम व डोंगराळ असा आहे. दाढोली व पाडळोशी हे मुख्य विभाग मानले जातात. पाडळोशी विभागात मोडणाऱ्या नाणेगाव खुर्द या गावातून चाहूरवाडी, कवठेकरवाडी, चव्हाणवाडी या गावांना जाणारा रस्ता आहे. या रस्त्यासाठी त्यावेळचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधीही पडला होता. यावेळी नाणेगावातील काही भाग वगळता संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरण झाले. नाणेगाव या गावाजवळून एक ओढा जातो. या मार्गावर हद्दीच्या वादामधून रस्त्याचे काम झालेले नाही. तसेच या मार्गावरील ओढ्यावरील फरशी पुलाचेही काम बऱ्याच वर्षापासून रेंगाळत पडलेले आहे. या गावात सत्ता बदल झाली तरीही येथील राहिलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही.

गावाशेजारुन वाहणाऱ्या या ओढ्यातूनच पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागतो. या गावकऱ्यांची बहुतांशी शेती ओढ्याच्या पलिकडच्या भागात असल्याने सतत या ओढ्याच्या पाण्यामधूनच वाट काढत नागरिक, महिलांना येजा करावे लागते. पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी थेट या ओढ्यात येत असल्याने ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून शांताबाई सर्जेराव थोरात ही महिला वाहून गेल्याने तिचा र्दुदैवी अंतत झाला. यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे धनाजी मोरे पुराचे पाण्यात अडकले मात्र सुदैवाने ते बचावले. या घटनेचे कसलेच गांभीर्य लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनास नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाणेगावसह चार गावांचा रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावरुन येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी यांना ओढ्यातूनच ये-जा करावी लागत आहे. गत वर्षी या ओढ्यावर साकव पूल करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. तर दोनच महिन्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार यांच्याकडे या पुलासाठी प्रस्ताव दिला आहे. मात्र आमच्या समस्येकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.

वैभव मूळगावकर , उपसरपंच, नाणेगाव खुर्द 

Leave a Comment