राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मतं फुटणार ? ‘या’ खासदाराने भाजप उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

 

 

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर राज्यतील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आमदारांनी मूळ शिवसेना हा पक्ष सोडत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपने त्यांना पाठींबा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत देखील शिवसेना खासदारांची मतं फुटणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना आपले पत्र दिले. खासदार भावना गवळी यांच्यानंतर इतर खासदार देखील भाजप पूरक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणालेत शवाळे नेमकं यावेळी
पत्रात शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या सामाजिक कार्याची कौतुक केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, यासाठी राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता.
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता.
हीच परंपरा कायम ठेवत शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा
पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदारानंतर खासदारांचा देखील वाढता भाजप कल ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटाच मानली जात आहे. त्यामुळे विधानपरिषदेप्रमाणे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील खासदार पक्षादेश धुडकावणार की पक्ष प्रमुख सांगतील ती भूमिका घेणार याकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे.