Axis Bank: कोटक महिंद्रा बँकेला झालेल्या तोट्याचा ॲक्सिस बँकेला मिळाला फायदा

Axis Bank overtake Kotak Mahindra Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड आणि नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. बँकेवर झालेल्या या कारवाईचा परिणाम गुरुवारी बँकेच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. गुरुवारी, 25 एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले.

कोटक बँकेचे शेअर्स BSE वर 1643 रुपयांवर बंद झाले, तर बँकेचे मार्केट कॅप 3,26,615 कोटी रुपयांवर घसरले. कोटक महिंद्रा बँकेला झालेल्या या तोट्याचा फायदा ॲक्सिस बँकेला मिळाला. मार्केट कॅपच्या बाबतीत ॲक्सिस बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.

ॲक्सिस बँक देशातील चौथी सर्वात मौल्यवान बँक –

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आणि मार्केट कॅप घसरल्यामुळे तिची प्रतिस्पर्धी ॲक्सिस बँकेला खूप फायदा झाला आहे. चांगल्या त्रैमासिक निकालांच्या आधारे ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अपेक्षेपेक्षा चांगल्या Q4 निकालांमुळे ॲक्सिस बँकेच्या समभागांनी 4% वाढ केली. शेअर्सच्या वाढीमुळे ॲक्सिस बँकेचे मार्केट कॅप 3.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ॲक्सिस बँकेने कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकून 3.3 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह देशातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.

देशातील सर्वात मौल्यवान बँका –

बाजार मूल्यांकनानुसार, HDFC बँक दलाल स्ट्रीटवर अव्वल स्थानावर आहे. 11.5 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह HDFC ही सर्वात मोठी बँक आहे. ICICI बँक 7.76 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि SBI 7 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या परिस्थितीत, ॲक्सिस बँकेने कोटकला मागे टाकून बाजार भांडवलाच्या बाबतीत चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.