कारभारी लय भारी! पती निवडून आल्यानंतर पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

– रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – पतीच्या यशामागे पत्नीचे मोलाचे योगदान असते असे आपण नेहमीच ऐकत असतो. पत्नी कधीच आपल्या भावना जाहिरपणे मांडत नसते. मात्र खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळु गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनाला भिडला. आणि त्यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर उचलून गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला. त्यामुळे या जल्लोषाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

निवडणुकांमध्ये आतापर्यंत एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते खांद्यावर उचलून जल्लोष करतात. महिला निवडून आली तर तिचे पती, भाऊ दोन्ही हाताने उचलून घेऊन विजयाचा जल्लोष साजरा करतात. मात्र खेड पाळु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाच्या पॅनलमध्ये आपल्या पतीचा गावात सर्वाधिक मताने विजय झाल्यानंतर पत्नी रेणुका गुरव हिने आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा करता आला नाही. मात्र पतीच्या विजयासाठी पत्नीने केलेला हा जल्लोष कौतुकास्पद असून गावच्या विकासासाठी पुढील काळात अशाच जोषात काम केले जाईल, असे विजयी उमेदवार संतोष गुरव यांनी सांगितले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे व गर्दी करणे यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पत्नी रेणुका सावंत यांनी आपल्या पतीला खांद्यावर घेऊन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत गावांमध्ये चक्कर मारली व त्यामागे कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण केली

पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील महिलांचं विजयी उमेदवारांच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयासाठी जल्लोष साजरा केला.

Leave a Comment