लोकसभेच्या एक्झिट पोलनंतर चीनने दिली प्रतिक्रिया, ‘मोदी पुन्हा सत्तेवर आले तर….’

बीजिंग – एक्झिट पोलने भारतात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार असल्याचे भाकित केल्यानंतर चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मोदी जर पुन्हा सत्तेवर आले तर भारतातील देशांतर्गत धोरण तसेच परराष्ट्र विषयक धोरण पहिल्याप्रमाणेच कायम राहील. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचाच भारताचा प्रयत्न असेल असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या हवाल्याने या मुखपत्राने नमूद केले की द्विपक्षीय संबंध, स्थिर विकास आणि मतभेद दूर करण्यासाठी खुल्या चर्चेची दारे उघडी राहणे आवश्‍यक आहे. भारताशी सहकार्याचे संबंध राहणे अतिशय महत्वाचे आहे.

आता मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा सत्तेत राहणारे ते दुसरे नेते ठरतील. अशा स्थितीत देशाच्या आत आणि बाहेर जी धोरणे त्यांच्या सरकारकडून राबवली जात आहेत त्यात सातत्य असेल. त्यात काही बदल केला जाण्याची शक्यता अगदीच कमी दिसते आहे. शिनुहा युनिर्व्हसिटीचे रणनीती विषयक तज्ज्ञ आणि यासंदर्भातील संस्थेचे संचालक कियान फेंग म्हणाले की येणाऱ्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यानंतर जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारतात वेगाने काम केले जाईल.

आपल्या कुटनितीच्या माध्यमातून जगात भारताचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जाईल. तसेच मोदींच्या पुनरागमनामुळे भारत आणि चीन यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यताही अगदी कमीच असेल. त्याकरता मोदी यांनी अलिकडेच केलेल्या एका विधानाचाही दाखल देण्यात आला. मोदी म्हणाले होते की भारत आणि चीन यांच्यातील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नाही तर संपूर्ण विभाग आणि संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहेत.