सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

लखनऊ – बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. यानंतर आता राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख चौधरी अजित सिंहही आघाडीची साथ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील सर्वात मोठा मतदारसंघ उत्तरप्रदेशमध्ये भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपा आणि आरएलडी यांनी आघाडी केली होती. परंतु, निवडणुकीत पराभवानंतर बसपाने आघाडीची साथ सोडली आहे. याच पार्श्वभूमीवर आरएलडीही लवकरच आघाडीचा हात सोडण्याची शक्यता आहे. यासाठी जयंत चौधरी यांची पक्षनेत्यांसोबत बैठक सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष मिळूनही भाजपचा सामना करण्यास अपयशी ठरले. निवडणूक निकालात बसपाला १० जागा, सपाला ५ जागा तर पश्चिम उत्तरप्रदेशमधून आरएलडीला एकही जागेवर विजय प्राप्त करता आला नाही. यामुळे आघाडीचा आरएलडीला कोणताही फायदा झाले नसल्याचे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय लोकदल पक्ष आघाडी सोडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.

Leave a Comment