“अग्नीवीर योजना म्हणजे बेरोजगार युवकांची थट्टा”; अक्षय गवते यांच्या निधनानंतर आव्हाडांचे विधान

 Jitendra Awhad : बुलढाणामधील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांचा शनिवारी पहाटे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. मात्र अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकांनी याला विरोध केला होता. मात्र तरीही देशातील अनेक राज्यातून युवकांची सैन्य दलात भरतीही झाली. अग्निवीर जवानांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळत असलेला लाभ, आणि सैन्यदलातील सेवेचा मिळत नसलेला शहीद हा दर्जा यावरुन ही भरतीप्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या भरतीवरुन ट्वीट करत सरकारला काही सवाल केला आहे.

तर, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सियाचिन ग्लेशियर येथे देशसेवेसाठी उभा असलेला अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. एका गरीब कुटुंबाचा आधारच निघून गेला. संपूर्ण परिवार दु:खात आहे. आता ना काही पेन्शन मिळणार, ना ग्रॅज्युटी मिळणार, ना कुठला सैनिकी सन्मान मिळणार. अग्नीवीर योजना म्हणजे बेरोजगार युवकांची थट्टा आहे,’ असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अग्निवीर जवानाच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत

  • विम्याची रक्कम : ४८ लाख रुपये
  • सानुग्रह अनुदान रक्कम : ४४ लाख
  • मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे सेवा होईपर्यंत पूर्ण वेतन
  • सशस्त्र सेना बॅटल कॅज्युअल्टी फंडातून : ८ लाख
  • आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनकडून तत्काळ मदत : ३० हजार
  • अग्निवीरद्वारे जमा केलेला सेवा निधी (पगाराच्या ३० टक्के) यात सरकार समान (व्याजासह) योगदान देईल.

काय म्हणाले होते राहुल गांधी ? 

याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अग्निवीर हा भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा प्लॅन असल्याचे ते म्हणाले होते. अग्निवीरच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन किंवा इतर लाभ दिले जात नाहीत.