शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीच कृषी सुधारणा – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीच सध्याच्या कृषी विषयक सुधारणा केल्या आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच कार्यरत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना या कायद्यांमुळे पर्यायी मार्केट मिळेल आणि त्यांच्या मालाला अधिक भाव मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.फिक्की संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे दावे केले आहेत.

दिल्लीत शेतकऱ्यांनी केंद्राने केलेले तीन्ही कायदे रद्द करावेत या मागणीसाठीचे आपले आंदोलन अधिक तीव्र केले असतानाच पंतप्रधान मोदींनी या आंदोलनाचा उल्लेख न करता कायद्यांचे जोरदार समर्थन करून ते कायदे शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहेत याची माहिती आज दिली.

त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या उन्नतीत जे काही अडथळे होते ते अडथळे आम्हीं केलेल्या उपाययोजनांमुळे दूर झाले आहेत. नवीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात तंत्रज्ञान पोहचणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुकही मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे हित आणि कल्याण जोपासण्यासाठीच सरकार धोरणांची आखणी करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकरी समृद्ध होतील असा विश्‍वासही मोदींनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठीच ही सारी खटाटोप सुरू आहे असेहीं त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले.

मोदी म्हणाले की उस उत्पादक शेतकऱ्यांना उसापासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात उद्योग संस्थांनी आत्तापर्यंत फारशी भागीदारी किंवा गुंतवणूक केली नाही ही समाधानाची बाब नाही असे नमूद करून पंतप्रधानांनी म्हटले आहे की उद्योगपतींनी कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे.

शीतगृहांची उभारणी आणि खतांच्या उत्पादनामध्येही फारशी गुंतवणूक होत नाही याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी खंत व्यक्त केली. आज देशाच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा वेगाने विकास होत असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

Leave a Comment