Agriculture News । शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा ग्राफ घसरतोय; सर्वेक्षणातून माहिती समोर

Agriculture News । ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांच्या मासिक खर्च करण्याच्या क्षमतेत घट होताना दिसून आली आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन अर्थात एनएसएसओच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

कुटुंबांची खर्च करण्याची क्षमता किती आहे हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा २०२२-२०२३ मधील (ऑगस्ट- जुलै) सरासरी खर्च ३७०२ रूपये होता. तर ग्रामीण भागातील अन्य कुटुंबाचा हा खर्च सरासरी ३७७३ रूपये होता. । Agriculture News

पूर्णत: शेतीवर विसंबून असलेल्या कुटुंबांची खर्च करण्याची क्षमता ही ग्रामीण भागातील अन्य कुटुंबांच्या तुलनेत सातत्याने कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ या कुटुंबांना आता शेतीतून म्हणावा तेवढा लाभ मिळत नसल्याचे अधोरेखित होते आहे.

मात्र पूर्वी स्थिती वेगळी होती. १९९९-२००० या काळात शेतीवर निर्भर कुटुंबांची प्रतिमहा खर्चाची क्षमता ५२० रूपये होती. त्याचवेळी ग्रामीण भागातील कुटुंबांचा एकूण सरासरी खर्च ४८६ रूपये होता. २००४-०५ मध्ये हे अंतर कमी झाले.

शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सरासरी खर्च कमी होऊ लागला. मात्र याच काळात ग्रामीण भागात राहणाऱ्या अन्य कुटुंबांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत वाढ होताना दिसली. त्यांची ही खर्चाची क्षमता सरासरी ५५९ रूपयांपर्यंत पोहोचली.

२०११-१२ मध्ये यात थोडा बदल झाला मात्र तो फार विशेष नव्हता. या काळात शेतीवरच्या कुटुंबांचा खर्च १४३६ होता तर अन्य कुटुंबांचा १४३० होता. शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांसोबतच काही वेळा शेतमजुरांच्या खर्चातही अन्य कुटुंबांच्या तुलनेत घट नोंदवली गेली.

अर्थतज्ज्ञ आता याच्या संभाव्य कारणांचा शोध घेत असल्याचे एका संकेतस्थळावर म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण हे त्यातील एक कारण मानले जाते आहे.  । Agriculture News

याचा अर्थ ग्रामीण भागात आता शेतीच्या व्यतिरिक्त अशीही अनेक कामे आली आहेत की जी लोकांच्या उत्पन्नाचे साधन ठरली आहेत. थोडक्यात अनेक लोक शेती सोडून अन्य कामांकडेही वळले आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुसरे एक कारण म्हणजे कोविडनंतर मोठ्या प्रमाणात शहरातून गावाकडे लोक परतले व ते पूर्णत: शेतीवर अवलंबून राहीले. त्यामुळे अन्य ग्रामीण कुटुंबांच्या तुलनेत या लोकांची खर्चाची सरासरी क्षमता घसरली आहे. । Agriculture News