शेतीचीही ‘महागाई’; बी-बियाणे, इंधन आणि मजुरीतही वाढ

वाल्हे (समीर भुजबळ) – सिलिंडर यासह भाजीपाला, धान्य एकुणच महागाई वाढली असल्याची ओरड विशेषत: शहरीभागातून अधिक प्रमाणात होत आहे. परंतु, शेतकरी या महागाईसह “शेतीच्या महागाईला’ही सामोरा जात आहे. शेती चांगल्या पद्धतीने केली तर फायद्याची ठरते. परंतु, गेल्या काही वर्षात शेती करण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पीक ऐन हंगामात आलेले असताना मजूर मिळत नाहीत. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्‍टरने काम करणेही परवडत आहे.
खराब हवामानाचा फटका शेतीला फटका बसू लागला आहे. तसेच मजुरी दर वाढले आहेत.पेरणीपासून पीक काढणीपर्यंत खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत बाजारपेठेत पीकाला भाव मिळत नाही. तरकारी (भाजीपाला) कोणत्याच पीकाला हमी भाव नसल्याने असे पीक घेणे हे शेतकऱ्यासाठी बहुतांशी वेळा तोट्याचे ठरते. त्यामुळे त्या पीकावर केलेला खर्च “मातीत’ जातो. सध्या, तर इंधनाचे दर वाढल्याने यंत्राद्वारे शेती करणेही महाग झाले आहे. एक एकराचा पेरणी ते काढणीचा वर्षभराचा खर्च 4 ते 5 हजारांपर्यंत गेला आहे. त्यामुळे शेती करताना उत्पन्न अन्‌ खर्च यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांना ही “महागाई’ त्रासदायक ठरत आहे.

दवसाला 450 रुपये; तरी मजूर मिळेना!
पेरणीपासून काढणी, मळणीपर्यंत मजुरांची गरज असते. 450 ते 500 रुपये मजुरी पुरुषाला द्यावी लागते, तर महिलेसाठी मजुरी 300 रुपये आहे. तरीही वेळेत मजूर मिळत नाहीत.

तासामागे 100 रुपयांनी महाग
काही भागात ट्रॅक्‍टरने शेतीतील कामे करताना तासावर मजुरी आकारली जाते. मागील वर्षभरात इंधन दरवाढीमुळे सरासरी एका तासामागे 100 रुपये वाढ झाली आहे. ट्रॅक्‍टरसाठी डीझेल लागते.

दोन वर्षांपूर्वी डिझेलचा लिटरचा दर 75 रुपयांच्या आत होता. आता दर 100 रुपयांच्या पुढे गेला असून, त्यामुळे ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीचे दर वाढवले आहेत. – अनिकेत भुजबळ, ट्रॅक्‍टर मालक

कधी पावसाचा फटका बसतो, तर काहीवेळा दर मिळत नसल्याने तोटा सहन करावा लागतो. पेरणी ते काढणीचा खर्च खुप वाढला आहे. शेतीवर भरवसा ठेणे कठीण बनले आहे. – धनंजय गायकवाड, शेतकरी