कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण ! प्रकृतीबाबत माहिती देत म्हणाले,”नागपूर अधिवेशन..”

CORONA UPDATE – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे. अशात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात,”नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.”

“मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल… सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी” असं आवाहन देखील यावेळी मंत्री मुंडे यांनी केलं आहे.

आरोग्य मंत्र्यांनी देखील दिला सतर्कतेचा इशारा
कोरोनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नाही. याची खात्री आम्ही केली आहे. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. पण तिथं जाताना काळजी घ्या. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.