अहिल्याबाई होळकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी; आ. पवारांकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन

जामखेड – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला आ. रोहित पवार यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौंडी येथे काल (मंगळवार) रात्री क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्‍वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचे पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला.

होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. चौंडीमध्ये होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त 298 फटाक्‍यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करून होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. या वेळी “येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली.

चौंडी येथील महादेवाचे मंदिर आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच रात्री 12 वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली, याचे आ. रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी चौंडीतील सीना नदीपात्रात 41 हजार पणत्यांपासून (50 बाय 50 आकार) पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीची अनोखी मानवंदना देण्यात आली. कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्रतिकृती साकारली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथील गडदे महाराज यांचे कीर्तन झाले. विविध भागातून चौंडीमध्ये आलेल्या नागरिकांसाठी आ. पवार यांनी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.