अहमदनगर | खासगी सावकरांवर सहकार कार्यालयाचे छापे

संगमनेर – तालुक्याच्या पठार भागातील साकूर या बाजारपेठेच्या मोठ्या गावात अवैध सावकारांचा उपद्रव वाढला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने अडल्या नडल्यांना कर्ज देताना, कर्जापोटी त्यांच्या मालमत्ता हडप करण्याच्या सावकारांच्या प्रयत्नांना सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे कायद्याचा लगाम लागला आहे. संगमनेरच्या सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार या सावकारांच्या घरावर केलेल्या कारवाईत कर्जासाठीची अनेक कागदपत्रे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या छाप्यात सचिन बन्सी डोंगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जापोटी घेतलेल्या रकमेच्या मोबदल्यात वेळोवेळी पैसे देऊनही पठार भागातील अनेक जण सावकारांच्या पाशात अडकले आहेत. कर्जासाठी केलेले गहाणखत, विसारपावती, खरेदीखत, धनादेश अशा कागदपत्रांच्या जाळ्यात अडकलेले ऋणको सावकारी तगाद्याला त्रस्त झाले होते. त्यातील काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले आहेत. या पार्श्वभुमिवर साकूर गावठाणात चरितार्थासाठी जनरल स्टोअर्स चालवणाऱ्या एका दांपत्याने धंद्यासाठी भांडवल, घर दुरुस्ती व मुलाच्या लग्नासाठी सचिन डोंगरे याच्याकडून १० लाख व राहुल डोंगरे याच्याकडून १५ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी साकूरमधील मिळकतीसह ग्रामपंचायत क्षेत्रात असलेली मिळकत गहाण ठेवून सचिन डोंगरे याच्याकडून शेकडा पाच आणि चाळीस टक्के व्याजदराने, तर राहुल डोंगरे याच्याकडून शेकडा २० टक्के व्याजाने कर्ज घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या कर्जापोटी सचिन डोंगरे याला ९ लाख ७२ हजार तर, राहुल डोंगरे याला ३२ लाख ७२ हजार ५७० रुपयांचा परतावा केला होता. तिसरा सावकार राहुल डोंगरे याने तक्रारदाराला वेळोवेळी ५३ लाख १२ हजार २०७ रुपये दिल्याचे व त्याबदल्यात त्यांच्याकडून ३३ लाख ३३ हजार ११० रुपये परतावा घेतल्याचेही दिसून आले आहे. तक्रारदराने ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे स्क्रिनशॉट जोडलेले आहेत. त्यानुसार राहुल डोंगरे याने तक्रारदराला दोनवेळा मिळून ४० लाख ७३ हजार २७ रुपये दिल्याचे व त्या बदल्यात त्याला २१ लाख ९७ हजार २४० व सचिन डोंगरे यास १ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसते.

अव्वाच्या सव्वा व्याजदरामुळे कर्ज वाढत असल्याच्या त्रासातून या दांपत्याने सचिन, बन्सी आणि राहुल डोंगरे या तिघा खासगी सावकारांच्या विरोधात संगमनेरच्या सहकार उपनिबंधकांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरुन सहकार उपनिबंधकांच्या पथकाने सावकारी कलमान्वये तिघाही सावकारांच्या घरावर छापा घातला. या छाप्यात तक्रारदाराने सचिन डोंगरे याच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या विवरणासह त्यांच्याकडून ५ लाख २० हजारांसह प्रत्येकी दोन लाखांची रक्कम टाकून घेतलेले धनादेश, या शिवाय अन्य लोकांकडून लिहून घेतलेल्या विसार पावत्या, गहाणखत, खरेदीखत, धनादेश, नोंदवही व त्यातील नोंदी असे मोठे घबाड तपास पथकाच्या हाती लागले. या छाप्यात ठोस पुरावे हाती लागल्यानंतर सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांनी घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याघटनेचा पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.