अहमदनगर – धनश्री फंडने जिंकले सुवर्णपदक राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा

श्रीगोंदा – पुण्यात पार पडलेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पयनशिप स्पर्धेमध्ये येथील तालमीच्या चार महिला मल्लांनी सहभाग नोंदवला होता. यात पै. धनश्री फंड हिने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. तिने बड्या पैलवांनाना चितपट करण्याची ही किमया केली.

धनश्रीला पाच कुस्त्या कराव्या लागल्या. त्यामध्ये तिने सर्व कुस्त्या जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिने लक्ष्मी (तेलंगणा), दिशा (राजस्थान), मीनाक्षी (उत्तर प्रदेश), ज्योती (हरियाना) यांना चितपट करत अंतिम कुस्तीत पोहोचली होती. अंतिम कुस्तीमध्ये गुजरातच्या भाविका पटेल हिला चितपट करत सुवर्ण जिंकले. वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी धनश्री ही पहिली महाराष्ट्रीयन पैलवान ठरली आहे.

यापूर्वी पुरुषांमध्ये राहुल आवारे याने ही कामगिरी साधली होती. दुसरी पैलवान आश्लेषा बागडे हिने ५७ किलो वज गटात रौप्यपदक पटकाविले. आश्लेषा ही सर्वसामान्य कुटुंबातील पैलवान असून, तिला कोणताही पैलवानांचा वारसा नसताना तिने आपल्या कष्टाच्या जिवावर मोठे यश संपादन केले. अंतिम कुस्तीत दिल्लीच्या नेहा शर्माबरोबर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वेदांतिका पवार ६८ किलो वजन गटात ब्राँझपदक मिळविले. भाग्यश्री फंडने ६२ किलो वजन गटात रौप्यपदक घेतले. तिचा अंतिम कुस्तीमध्ये हरियानाच्या सविता बरोबर अटीतटीच्या लढतीत पराभव झाला.